मुंबई विमानतळावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, तस्करी करणाऱ्यांना अटक..!!

जप्त केला 1496 ग्रॅम इतका कोकेन अंदाजीत बाजार मूल्य 15 कोटी रुपये..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महसूल गुप्तचर संचालनालयानं [The Directorate of Revenue Intelligence (DRI)] अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहीमेअंतर्गत मोठं यश मिळवलं आहे. डीआरआयने आदिस अबाबाहून ET 640 या विमानाने मुंबईत आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 1496 ग्रॅम इतका कोकेनचा साठा जप्त केला. याचे अंदाजीत बाजार मूल्य 15 कोटी रुपये इतके आहे.

डीआरडीआयला याबाबत आधीपासूनच माहिती असल्याने, सातत्यपूर्ण चौकशी आणि पाळत ठेवली गेली होती. त्यानंतर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ही नियोजनपूर्वक कारवाई केली गेली. या प्रवाशाच्या हालचाली संशस्पद वाटल्याने, विमानतळावर उतरताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यात त्याच्याकडे कोकेनचा साठा सापडला. हे प्रतिबंधीत अमली पदार्थ ज्या व्यक्तीला दिले जाणार होते त्या महिलेला अटक करण्यातही संचालनालयाला यश आले आहे. अटक केलेली महिला ही युगांडाची नागरिक असून, नवी मुंबईत, वाशी इथे तिला अटक केल्याचे डीआरआयने कळवले आहे.

हे अमली पदार्थ आणणाऱ्या आणि ते मागवणाऱ्या दोघांनाही अमली आणि मादक पदार्थ प्रतिबंध कायदा १९८५ मधील तरतुदींनुसार अटक केल्याचं डीआरआयने कळवलं आहे. पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version