भारतीय रेल्वेच्या 2843 किलोमीटरच्या एकूण समर्पित मालवाहतूक मार्गिकांपैकी 1610 किलोमीटर लांबीच्या भागाचे काम पूर्ण..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दोन समर्पित मालवाहतूक मार्गिकांची उभारणी हाती घेतली असून त्यात लुधियाना ते सोननगर असा 1337किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका म्हणून तर जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल ते दादरी असा 1506 किलोमीटर लांबीचा टप्पा पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका म्हणून उभारण्यात येत आहे. यासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण 2843 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी 1610 किलोमीटर लांबीच्या मार्गावर समर्पित मालवाहतूक मार्गिका बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

समर्पित मालवाहतूक मार्गिका उभारल्यामुळे, मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेगवान प्रवास, दुमजली कंटेनर्स वाहून नेणाऱ्या गाड्या आणि अवजड माल वाहून नेणाऱ्या गाड्या यांच्या वापरातून अधिक उत्तम वाहतूक व्यवस्था आणि अधिक वाहन क्षमता प्राप्त करणे शक्य होईल. या उपक्रमामुळे मालवाहतुकीसाठी येणारा प्रती एकक खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून मालाच्या वाहतुकीसाठी होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. यामुळे संदर्भित मार्गिकांच्या परिसरातील उद्योग तसेच मालवाहतूक क्षेत्रातील इतर सहभागी यांच्यासाठी असलेल्या पुरवठा साखळीत सुधारणा होईल आणि त्यातून आयात-निर्यातसंबंधी वाहतुकीत देखील वाढ होईल.

समर्पित मालवाहतूक मार्गिकांच्या उपरोल्लेखित लाभांमुळे या मार्गिकांच्या लगतच्या परिसरात राबविल्या जात असलेल्या औद्योगिक मार्गिका/ टाऊनशिप प्रकल्पांना गती मिळून त्या भागातील औद्योगिक घडामोडींना प्रोत्साहन मिळेल. पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकांवरील नवी मालवाहतूक टर्मिनल्स, बहुविध प्रकारचे लॉजिस्टिक पार्क आणि अंतर्गत कंटेनर डेपो यांच्या उभारणीचे काम प्रगतीच्या विविध टप्प्यांवर आहे.

Exit mobile version