नदीमध्ये बुडणाऱ्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात सहा जणांना जलसमाधी

जोयडा, निर्भीड वर्तमान:- नदीत पोहण्याकरिता उतरलेल्या एका मुलीला बुडताना वाचविण्याच्या प्रयत्नात सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दांडेली शहरापासून १३ किमी अंतरावरील जोयडा तालुक्यातील अकोडा गावाजवळच्या काळी नदीत ही दुर्घटना घडली आहे.

बंगळुरू आणि हुबळी येथून आलेल्या एका कुटुंबातील आठ जण पोहण्यासाठी रविवारी सायंकाळी अकोडा येथील काळी नदीच्या पात्रात उतरले होते. नदीत गेलेल्या या आठ जणांपैकी एक मुलगी पाण्यात बुडू लागली तिला बुडताना पाहून इतर पाच जण तिला वाचवण्यासाठी पाण्यात गेले असता, तेही पाण्यात बुडाले.

हुबळी येथील ईश्वरनगरमधील ४० वर्षीय नजीर अहमद आणि त्यांची मुलगी अल्पिया (१०), मोहिनी (६), नजीरची बहीण रेश्मा उन्निसा (३८) आणि त्यांची मुले इफ्रा (१५), आबिद (१२) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्याने सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version