फटाके उडवण्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या मर्यादा पोलीस अधीक्षकांकडून अधिसुचनेद्वारे जाहीर
सातारा :- दिवाळी व इतर सणाचे वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणा-या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियम व सुधारीत नियम 89 जे फटाक्याच्या आवाजाच्या मानांकनाबाबत आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे तसेच शोभेचे दारुकाम निष्काळजीपणाने करणे इत्यादी संभाव्य कृत्यामुळे जनतेच्या जिवितास व मालमत्तेस हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा प्रकारे हानी होवू नये म्हणून तसेच रहदारीच्या नियमनासाठी व सार्वजनिक शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) व्दारा प्रधान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मनाई आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केले आहे.
सदर आदेशात फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणा-या फटाक्यांची उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. साखळी फटाक्यासाठी (Joint Fire Crackers) वरील क्र. १ मध्ये नमुद केलेल्या आवाजाच्या मर्यादेच्या पातळीत 5 Log 10 (N) डेसीबल पर्यंत शिथीलता देण्यात येत आहे. ज्यात एका साखळी फटाक्यातील एकूण फटाक्यांची संख्या उदा. साखळी फटाक्यात एकूण 50, 50 ते 100 आणि त्यावरील फटाके असतील आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 115, 110 व 105 डेसिबल एवढी असावी. दिवाळी या सणानिमित्त जनतेला फटाके उडविणेस सकाळी 6 ते रात्री 10 वा. चे परवानगी राहील. रात्रौ 10 ते सकाळी 6 वा. पर्यंत उर्वरित वेळेत फटाक्यांचे, दारुकाम किंवा फटाके यांचा वापर करण्यास मनाई आदेश करण्यात येत आहे. फटाक्यांची दुकाने जमीनीलगत असावीत परवानाप्राप्त प्रत्येक स्टॉलमध्ये 100 कि.ग्रॅ. फटाके व 500 कि.ग्रॅ. चायनीज क्रॅकर (शोभेचे फटाके ) यापेक्षा जास्त साठा असणार नाही. प्रत्येक स्टॉलमधील अंतर 3 मीटरपेक्षा कमी नसावे तसेच कुठल्याही सुरक्षीत घोषीत केलेल्या सिमेपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉलची जागा नसावी. एकापेक्षा जास्त स्टॉल असतील तर त्याचे प्रवेशव्दार समोरासमोर नसावे. एका ठिकाणी 50 पेक्षा जास्त स्टॉल नसावेत. अशा प्रकारे एकापेक्षा जास्त समुह होत असतील तर दुस-या प्रत्येक समुहातील अंतर 50 मीटर पेक्षा कमी नसावे. स्टॉलचे ठिकाणी तेलाचा दिवा, मेणबत्ती निषीध्द आहे. विद्युत प्रवाह वायरिंग योग्यरितीने केलेली आहे याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. विदयुत निरीक्षकाकडून प्रमाणीत करावे. फटाक्याच्या दुकानाचा आपत्कालीन मार्ग हा नेहमी खुला असावा त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा नसावा तसेच स्टॉलच्या ठिकाणी धुम्रपानास सक्त मनाई आहे. योग्य अग्नीप्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी. फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी व दुकानात ग्राहकांची गर्दी होवू देवू नये. कुठल्याही अपघातास तोंड देण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था केलेली असावी. खराब स्थितीत असलेल्या कुठल्याही फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. 25 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे 3.8 से.मी. पेक्षा जास्त लांबीचे व अॅटमबॉम्ब नावाने ओळखले जाणा-या फटाक्यांची व क्लोरटचा समावेश असलेले फटाके विक्री केली जाणार नाही. तीन इंचापेक्षा जास्त लांबीचा आणि अर्धा इंचापेक्षा जास्त व्यासाचे कागदाचे नळीपासून केलेला गणपावडर व नायट्रेट मिश्रीत परंतू क्लोरेट नसलेल्या चिनी फटाक्यांची विक्री केली जाणार नाही. फुटफुटी किंवा तडतडी मल्टीमिक्स, चिखपाल, चिडचिडीया, बटरफलाईज या नावाने ओळखले जाणा-या पिवळा फॉस्परसयुक्त असलेल्या अत्यंत विषारी फटाक्यांची विक्री केली जाणार नाही. शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येवू नये शांतता झोनमध्ये रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादीच्या सभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्र येते तसेच पेट्रोलपंप, केरोसीन व इतर ज्वालाग्रही पदार्थांचा साठा व विक्री करण्याच्या ठिकाणापासून 100 मीटरचे परिसरात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येवू नये. रॉकेट डोक्याचा भाग हा 10 से.मी. पेक्षा जास्त लांबीचा नसावा व 2.5 से.मी. पेक्षा जास्त जाडीचा व्यास नसावा. आपटबार व उखळीदारु उडविण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फटाका विक्रीधारक व नागरिकांनी परदेशी फटाके बाळगू नये किंवा विक्री करु नये. 10 हजार फटाके पेक्षा जास्त लांबीची फटाक्यांची माळ असता कामा नये त्यावर बंदी आहे. फटाका दुकानातील विक्रेता व कामगांर यांना फटाक्यांच्या घातक स्वरुपाबद्दल तसेच फटाके सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कशी हाताळावीत याचे योग्य प्रशिक्षण दयावे. 18 वर्षाखालील मुलांना सोबत प्रौढ माणूस असल्याशिवाय फटाके विक्री करता येणार नाही. फटाक्याच्या लडी व असे फटाके जे मोठया प्रमाणात हवा प्रदुषित करुन आवाज घनकचरा करतात अशा प्रकारचे फटाके फोडण्यास मनाई करणेत येत आहे. जिवित व वित्त हानी होवु नये म्हणुन तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे दिवे/कंदील आदी
उडविण्यास मनाई करणेत येत आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (यु) अन्वये केलेले नियम / आदेशाचा भंग केल्यास कलम 131 (ख) (1) अन्वये 8 दिवसांपर्यंत इतक्या कारावासाची किंवा रु. 1250/- (अक्षरी एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत) वाढविता येवू शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल. किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
फटाके तयार करणारे व विक्री करणा-यांनी वरील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनी फटाके गर्दीच्या ठिकाणी न उडविता मोकळया जागेत जेथे वस्ती व वर्दळ नाही अशा ठिकाणी तसेच शांतता क्षेत्रामध्ये ( रुग्णालये, प्रसुती गृहे, प्राथमिक व जिल्हा आरोग्य केंद्रे, शैक्षणीक संस्था – शाळा-कॉलेजेस, न्यायालये, धार्मिक स्थळे इ.) फटाके उडवु नयेत. कोणत्याही परिस्थितीत फटाक्यांचे आवाज हे 125 डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये.
सदरची अधिसुचना सातारा जिल्हयाचे हद्दीत दिनांक 29 ऑक्टोबर ते दिनांक 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अंमलात राहणार आहेत.