प्रसारमाध्यमांची कार्यशाळेचे आज गोंदिया मध्ये होणार आयोजन..!!

पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या वतीने आज हॉटेल गेटवे, बालाघाट रोड गोंदिया येथे एक दिवसीय प्रसारमाध्यम कार्यशाळा ‘वार्तालाप’ चे आयोजन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (भा.पो.से.) यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन समारंभ सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत होईल.

उद्घाटन सत्रानंतर पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत आयोजित  तांत्रिक सत्रामध्ये व्याख्याने होणार आहेत. दुपारी 12 ते 2.30 या दरम्यान होणाऱ्या प्रथम तांत्रिक सत्रामध्ये ‘मुद्रित माध्यमांची विकास संवादामध्ये भूमिका’ या विषयावर दैनिक भास्करच्या नागपूर आवृत्तीचे संपादक मनिकांत सोनी यावर मार्गदर्शन करतील. ‘विकास संवादामध्ये पत्रकारांची भूमिका’ या विषयावर लोकमत  समुहाचे वरिष्ठ संपादक विकास मिश्रा मार्गदर्शन करतील. ‘विकास संवादामध्ये समाज माध्यमांची भूमिका’ या विषयावर गोंदियाचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते हे आपले विचार मांडतील.

दुपारी 2.30 ते 5 वाजताच्या दरम्यान आयोजित तांत्रिक  सत्रामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांची विकास संवादामध्ये भूमिका’  या विषयावर दूरदर्शन केंद्र रायपूरचे सहाय्यक संचालक डॉ.मनोज सोनोने हे आपली भूमिका मांडतील. पत्र सूचना कार्यालय नागपूर आणि विकास संवाद या विषयावर सुद्धा यादरम्यान एक सादरीकरण करण्यात येईल. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद सुद्धा या पत्रकार प्रसार माध्यम कार्यशाळेमध्ये साधण्यात येणार आहे सायंकाळी 4.40  ते 5 या कालावधीत प्रतिसाद संकलनाने कार्यशाळेचा समारोप होणार आहे. या प्रसारमाध्यम कार्यशाळेस गोंदीया जिल्ह्यातील माध्यमप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्र सूचना कार्यालय नागपूरचे उपसंचालक (माध्यम आणि संवाद) शशीन राय यांनी केले आहे.

Exit mobile version