पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयकडून सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला अटक

तपासादरम्यान सुमारे 42.70 लाख रुपये केले हस्तगत

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच मागितल्या आणि स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.

मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) या अधीक्षकाविरोधात आलेल्या तक्रारीवरून सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीच्या प्रलंबित जीएसटी (GST) प्रकरणात तडजोड करण्यासाठी या अधीक्षकाने कंपनीकडे पहिल्यांदा 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र या प्रकरणी 15 लाख रुपये लाच देण्याचे संगनमताने निश्चित करण्यात आले. तक्रारदाराकडून ठरलेल्या एकूण रकमेपैकी 5 लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारताना सीबीआयने आरोपीला सापळा रचून रंगेहात पकडले.

आरोपीच्या मुंबई आणि गाझियाबाद येथील कार्यालयांची आणि घरांची झडती घेतली असता त्याच्याकडून 42.70 लाख (अंदाजे) रुपयांची रक्कम आणि जंगम/स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर गैरव्यवहारांचे दस्तऐवज हस्तगत करण्यात आले.

अटक केलेल्या आरोपीला मुंबईतल्या सीबीआय प्रकरणांसाठी नियुक्त विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्याला 21.08.2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Exit mobile version