उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा झाला गौरव समारंभ..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दोषसिध्दी झालेल्या प्रकरणी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव समारंभ काल दिनांक ०१/०३/२०२३, नेस्को ग्रॅन्ट हॉल, वेस्टर्न हायवे, गोरेगांव (पूर्व) मुंबई या ठिकाणी पार पडला.

सन २०१७ ते माहे ऑगस्ट- २०२२ या कालावधीतील मा. सत्र न्यायालयात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार / विनयभंग सह पोक्सो कायदया अंतर्गत दाखल गुन्हे व सरकारी नोकरांवरील हल्ले अशा विविध गंभीर गुन्हयातील आरोपीतांना एक महिन्याच्या कारावासापासून ते जन्मठेपे पर्यंत शिक्षा होऊन दोषसिध्दी होण्याकामी अथक प्रयत्न केलेल्या तपासी अधिकारी, न्यायालयीन कामकाज पाहणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या चांगल्या कामाचे श्रेय व भविष्यात आणखी चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे जनमानसात पोलीसांची प्रतिमा वृध्दींगत होण्यासाठी, पोलीसांविषयी विश्वास वाढण्यास मदत होण्यासाठी गौरव समारंभाचे आयोजन मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.

या कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. श्री ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग राजीव जैन, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-८ श्री दिक्षित गेडाम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ११ श्री अजय कुमार बंसल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १२ श्रीमती स्मिता पाटील, गौरव करण्यात आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार, पत्रकार बंधू व इतर उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या हस्ते परिमंडळ-८, परिमंडळ – ११ व १२ मधील एकूण १४१ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्ती पत्रक देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी सादर केली. कार्यक्रमा दरम्यान मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी मार्गदर्शन करताना दोषसिध्दी झालेल्या प्रकरणांची प्रसिध्दी देणे आवश्यक असून त्यामुळे समाजामध्ये पोलीसांप्रती विश्वास निर्माण होतो, गुन्हेगारांवरती वचक निर्माण होतो याकरीता सर्व तपास अधिकारी आणि न्यायालयीन कामकाज पाहणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगून भविष्यातही अशा प्रकारे उत्तम कामगिरी करण्याकरीता त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर इतर वरिष्ठांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाअंती मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version