छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या महिला-20 च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा महत्त्वपूर्ण सहभाग..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- छत्रपती संभाजीनगर येथे 28 फेब्रुवारी 2023 रोजी जी 20 अंतर्गत महिला 20 ची प्रारंभिक बैठक झाली. भारतीय नौदलातील महिला अधिकारी आणि सेवेतील वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या जोडीदारांनी त्यांचे अनुभव आणि भारतीय नौदलातील त्यांचा प्रवास यावेळी कथन केला. अडथळ्यांवर मात: असामान्य महिलांच्या कथा या संकल्पनेवर आधारित संवादाचे आयोजन केले होते. त्यात मनोगत व्यक्त करणाऱ्यांच्या शब्दातून आणि मनोभूमिकेतूनही भारतीय नौदलातील महिला सशक्तीकरण तसेच समावेशकतेचे प्रतिबिंब दिसत होते. प्रत्येकाकडे सांगण्यासारखे काही खास आणि अनोखे असे होते.

उंचीच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि एक कुशल एअरक्रू बनण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल लेफ्टनंट कमांडर स्वाती भंडारी यांनी माहिती दिली. त्यांनी कार्यान्वयन आणि शोध तसेच बचाव मोहिमेतही भाग घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 2022 च्या महिला दिनी या कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान केला आहे. सर्जन कमांडर शाझिया खान या स्त्रीरोग शस्त्रक्रियेतील तज्ञ आहेत. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आलेले अनुभव आणि नौकाविहार, नौकानयन तसेच नुकतीच केलेली राजस्थान कार रॅली या सर्वातून आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडण्यात झालेली मदत त्यांनी उलगडून सांगितली. लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांनी, प्रजासत्ताक दिन संचलनात एनसीसी तुकडीचा भाग होण्यापासून ते यंदा प्रजासत्ताक दिनी 144 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय नौदल तुकडीचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अभिमानाने कथन केला. लेफ्टनंट कमांडर तविशी सिंग या नौदलात जहाज उभारणी संदर्भातील कामे करतात. युद्धनौकांच्या जलावतरणपूर्व आणि वितरणाशी संबंधित कामे वेळेवर पूर्ण व्हावेत याची खातरजमा करण्यासाठी जहाज उभारणी कारखान्यातील कामाची देखरेख त्या कशी करतात याचे त्यांनी वर्णन केले. लेफ्टनंट कमांडर दिलना आणि रूपा, या दोन महिला अधिकारी सध्या आयएनएसव्ही तारिणी या जहाजावर दक्षिण अटलांटिकमध्ये नौकानयन करत आहेत आणि एका आशियाई महिलेकडून प्रथम प्रदक्षिणा करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांचे थेट येणे हा एक अद्भुत अनुभव होता.

नौदल कल्याण संस्था (एनडब्लूडब्लूए) नौदल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जीवनसाथीद्वारे चालवली जाणारी संघटना आहे. या उपक्रमातील सुरुवातीच्या सदस्य दीपा भट यांनी या संघटनेच्या भूमिकेचे महत्व शेवटी विषद केले.

बदलत्या काळानुसार एनडब्लूडब्लूए देखील लिंग तटस्थता स्वीकारण्यासाठी विकसित झाली आहे. नौदलात कार्यरत जीवनसाथी कशी भूमिका बजावतात आणि नौदल आपली जबाबदारी पार पाडत असतानाही मागे असलेल्या कुटुंबांना आधार देणारे चांगले पाठबळ देणारे बंध राखून ते बळ देणारे म्हणून कसे काम करतात यावर त्यांनी प्रकाश टाकला.

Exit mobile version