केंद्रीय मंत्री मा.नितीन गडकरी यांच्या हस्ते परभणी येथे एकूण 1058 कोटी रुपये किंमतीच्या कार्याचे लोकार्पण आणि भूमिपूजन..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- उत्तम पायाभूत सुविधांनी मराठवाड्याच्या विकासात एक पाऊल पुढे टाकत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी परभणी येथे एकूण १,०५८ कोटी रुपये किंमतीच्या व ७५ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सुधारणा कार्याचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले आहे. परभणी जिल्ह्याला समृध्दी महामार्गाद्वारे पुणे-मुंबईला कसे जोडता येईल, याकरिता योजना तयार करायच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी,खासदार संजय जाधव उपस्थित होते.

भूमिपूजन करण्यात आलेल्या पारवा ते असोला या बाह्यवळण महामार्गामुळे औद्योगिक, कृषी व अवजड मालाची वाहतूक जलद होण्यास मदत होईल. वेळेची व इंधनाची बचत होईल व सुरक्षित वाहतूक करणे शक्य होईल. जिंतूर ते शिरजशाहपूर हा हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ व नांदेड येथील गुरुद्वारा यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाच्या सुधारणेमुळे औद्योगिक, कृषी व साखर कारखान्यांसाठी वाहतूक सोयीची होईल. तसेच नांदेड, हिंगोली व परभणी हे जिल्हे छत्रपती संभाजी नगरला जोडले जातील.

पाथरी ते सेलू या महामार्गावर श्री संत साई बाबा यांचे जन्मस्थान पाथरी असल्यामुळे या मार्गामुळे भाविकांना याठिकाणी पोहोचणे सोयीचे होईल. हा विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे यामुळे नागरिकांची वाहतूक सुरळीत होईल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मोरेगाव –हातनूर – वालूर – बोरी – वसा या नवीन रस्त्याच्या कामाला सीआरआयएफ अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त परभणी – गंगाखेड गोदावरी नदीवरील पुलासाठी १५० कोटी रुपयांसह मंजूरी देण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय इतर ५ रस्ते विकास प्रकल्पांच्या कामांना मंजूरी देण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगोली येथे राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील वाशिम – पांगरे या १,०३७.४ कोटी रुपये किंमतीच्या व ४२.३० किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचेही लोकार्पण केले. यावेळी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी प्रामुख्याने उपस्थित होते. नव्याने मंजूर झालेल्या इंदौर – जबलपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे विदर्भासह हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील जनतेला त्याचा मोठा फायदा होणार आहे .हिंगोली जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. आता येथील हळद संशोधन केंद्राने गती घेतली आहे. शंभर एकर जागेत लॉजिस्टिक पार्क उभारला जाईल. त्यात हळद क्लस्टर साठी मोठा  संधी असून हळदीसाठी प्रसिद्ध हिंगोली जिल्हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर पोहोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी केले.

राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील अकोला – वाशिम – हिंगोली – वारंगा फाटा या भागाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग अकोला, वाशिम, हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

वाशिम ते पांगरे या राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील भागाचे आज लोकार्पण करण्यात आले. या मार्गामुळे इंदौर – अकोला – वाशिम – हिंगोली – नांदेड – हैदराबाद ही वाहतूक सुरळीत होईल. या मार्गावर असलेल्या ११.९ किमी च्या बायपास रस्त्यामुळे कनेरगाव नाका आणि हिंगोली शहरातील वाहतूक सुलभ होईल. वेळेची व इंधनाची बचत होईल तसेच प्रदूषणाची पातळीही कमी होईल. स्थानिक शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे सोयीचे होईल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंगोली शहरात वासंबा फाटा याठिकाणी २० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाला मंजूरी देण्यात आली. वाशिम शहरातील मुख्य रस्त्याच्या ४-लेन कामास मंजूरी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर ३ महामार्ग कामांना मंजूरी दिली. याशिवाय वाशिमसारख्या आकांक्षित जिल्ह्यात जलसिंचनासाठी २० तलावांचे खोलीकरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

Exit mobile version