ऑपरेशन गोल्डमाइन, 25.26 कोटी रुपये किमतीची 48 किलो सोन्याची पेस्ट केली जप्त..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- ऑपरेशन गोल्डमाइन अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर 48.20 किलो सोन्याची पेस्ट जप्त केली आहे. अलीकडच्या काळात विमानतळावरील ही सोन्याची सर्वात मोठी कारवाई आहे.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी 07.07.2023 रोजी शारजाहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX172 ने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतात तस्करी करण्यासाठी पेस्ट स्वरूपात सोने घेऊन आल्याच्या संशयावरून 3 प्रवाशांना रोखले होते. यावेळी या प्रवाशांच्या हातातील बॅगेज तसेच चेक-इन बॅगेजची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 5 काळ्या पट्ट्यांमध्ये लपवलेल्या 20 पांढऱ्या रंगाच्या पॅकेटमध्ये पेस्ट स्वरूपात लपविलेले 43.5 किलो सोने सापडले. हे सोने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने भारतात तस्करी करण्यासाठी लपवण्यात आल्याचे प्रवाशांच्या चौकशीत उघड झाले आहे. याशिवाय आणखी 4.67 किलो सोन्याची पेस्टही पुरुष स्वच्छतागृहातून जप्त करण्यात आली. प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण 48.20 किलो सोन्याच्या पेस्ट मधून सुमारे 25.26 कोटी रुपये किमतीचे 42 किलोपेक्षा जास्त सोने (शुद्धता 99%) प्राप्त झाले आहे.

सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले त्या आधारे एका अधिकाऱ्यासह 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक संघटित तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. हे संपूर्ण जाळे मोडून काढण्याच्या उद्देशाने अशा प्रकरणांमध्ये विमानतळावरील अधिकाऱ्यांसह अन्य व्यक्तींचा सहभाग शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version