वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलामधील सोन्याच्या तस्करीच्या विविध प्रकरणांशी संबंधित तपासादरम्यान, काही परदेशी नागरिकांचा गट तस्करी केलेल्या सोन्यावर प्रक्रिया आणि त्याचे वितरण करत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या तस्करी केलेल्या सोन्याची किंमत हवाला मार्गे केली जात असल्याची माहिती देखील प्राप्त झाली होती. सिंडिकेटचा डाव उधळून लावण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि संशयित भारतीय नागरिकांच्या प्रवासाच्या विशिष्ट पद्धतीवर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने काळजीपूर्वक पाळत ठेवली होती. सोमवार, 23.01.2023 रोजी, डीआरआय मुंबईच्या अधिका-यांनी गुप्त माहितीच्या आधारावर, एक योग्य वेळ साधून आणि समन्वित कारवाईचे नियोजन केले आणि अंमलात आणली. सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत, डीआरआय अधिकार्यांच्या पथकाने ज्या संशयित जागेवर तस्करी केलेले सोने वितळणे आणि त्यावर प्रक्रिया केली जात होती, त्या जागेची झडती घेतली. या परिसराची कसून झडती घेतल्यावर, प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असलेले 36 किलोपेक्षा जास्त वजनाचे बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले. या सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे 21 कोटी रुपये इतके आहे. या परिसराच्या प्रभारी व्यक्तीने कबुली दिली की, आपल्याला हे सोने विदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून शरीरात लपवलेल्या कॅप्सूलच्या स्वरूपात, प्रवासी बॅग मधून, कपड्यांच्या थरात लपवून तसेच विविध प्रकारच्या मशीनच्या माध्यमातून मिळाले. या व्यक्तीकडे 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड देखील आढळून आली.